हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती साऱ्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मात्र, शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली. या गर्दीचे नियोजन कोलमडल्याने गडावर चेंगराचेंगरीची मोठी घटना घडली असून, यामध्ये १५ ते २० शिवभक्त जखमी झाल्याची माहिती आहे.
शिवनेरी गडावर नेमकं काय घडलं ?
शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. मध्यरात्रीपासूनच गडाच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली. अंबरखाण्याच्या खालील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यासारख्या अरुंद मार्गांवर एकाच वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.
या घटनेत काही महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळालीय. जखमींना तातडीने जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवजयंती हा राज्याचा मोठा सण असूनही, दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी का घेतली नाही? असा संतप्त सवाल आता शिवभक्तांकडून विचारला जात आहे.