भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगला मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील खानचंद सिंग यांचे स्टेज 4 कॅन्सरशी झुंज देत असताना आज शुक्रवारी निधन झाले. माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावर ही माहिती देत रिंकू आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
खानचंद सिंग यांच्यावर ग्रेटर नोएडातील यथार्थ रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रिंकू सिंगने वडिलांची प्रकृती गंभीर असल्यामुळे टी20 विश्वचषक मधील सुपर-8 सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या कॅम्पमधून तात्पुरता ब्रेक घेतला होता.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज १ मार्च रोजी कोलकाता मैदानावर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र इतकं दुःख असूनही रिंकू सिंग आता पुन्हा टीम इंडियामध्ये सामील होण्यास सज्ज आहे. बीसीसीआय मॅनेजमेंटने माहिती दिलीये की, रिंकू सिंग कोलकाताच्या गार्डन्सवर होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर ८ सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये सामील होणार आहे.
वर्ल्डकप सोडून रिंकू वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहोचला होता. या क्षणी क्रिकेट जगतातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. मात्र आता दुःख विसरून रिंकू टीममध्ये सहभागी होणार आहे.
टीम इंडियासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा उद्याचा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजेता दक्षिण आफ्रिकेसह गट १ मधून सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. आता या सामन्यात सर्वांचं लक्ष रिंकू सिंगवर असणार आहे. रिंकूसाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना महत्त्वाचा असणार आहे.