वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे यंदा आंब्याचा बराचसा मोहोर गळून गेला. त्यामुळे राज्यातील जवळपास अनेक ठिकाणचे आंब्याचे पीक वाया गेले. त्यामुळे एप्रिल उजाडल्यानंतरही बाजारात आंब्याची आवक फारशी दिसून आलेली नाही. याचा फायदा घेऊन काही लोक अवैध रसायनांचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार करत आहेत.
हैदराबादमध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबवत रसायनांचा वापर करून पिकवलेला आंबा जप्त केला. ४ एप्रिल रोजी पोलिसांनी आंध्र प्रदेशातील दोन घाऊक फळ व्यापाऱ्यांना अटक केली. आंबे पिकवण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात रसायने वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चुडी बाजार येथे फळांचा व्यापार करणाऱ्या एकाने आंबे पिकवण्यासाठी डायमंड रायप इथिलिनचा वापर केल्याचे आढळून आले आहे.
हैदराबाद अन्न भेसळ दक्षता पथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्यापारी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पिकवणारे रसायन वापरत होता. फळे पिकवणाऱ्या रसायनाची दोन डझनांहून अधिकची पाकिटे आम्ही जप्त केली आहेत. तसेच पोलिसांनी शहरातील विविध गोदामांमधून साधारण सात टन आंबे जप्त केले आहेत. हे आंबे इथिलीन आणि कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
हैदराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले की, आंबे पिकवण्यासाठी काही गोदामांत त्याची साठवणूक केली जाते. हे गोदाम, किरकोळ विक्रेते यांच्या दुकानांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी एच-फास्ड कडे देण्यात आली आहे.