राज्यातील लाखो रेशनकार्ड धारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील लाखो रेशनकार्ड धारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
रेशनकार्डधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने रेशन दुकानांवर जाण्याची गरज भासणार नाही.



कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वारंवार बाहेर पडावे लागू नये, यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उन्हात होणारा त्रास टाळण्यासाठी शासनाने हा उपाय केला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचे धान्य वितरित करण्यात येईल. यामुळे लाभार्थ्यांना वारंवार रेशन दुकानांवर जाण्याचा त्रास कमी होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फायदा होईल.

प्रति व्यक्ती आणि कुटुंबाला मिळणारे धान्य
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १५ किलो धान्य मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १०५ किलो धान्य प्रति कुटुंब मिळणार आहे. या धान्यात तांदूळ आणि गहू यांचा समावेश आहे.

या निर्णयाचा लाभ अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील सर्व पात्र रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. या दोन्ही गटांतील नागरिकांना एप्रिलमध्येच तीन महिन्यांचे धान्य दिले जाईल. धान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी वेळेत धान्य उचलावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group