नाशिकमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आणि भव्य धार्मिक सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते रामकुंड येथे धर्मध्वजारोहण करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक धार्मिक विधी आणि संत-महंतांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण गोदाघाट परिसर भक्तिमय झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे रामकुंड परिसरात ११ वाजून ४० मिनिटांनी आगमन झाले. याठिकाणी गोदा पूजनानंतर गंगा गोदावरी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अन्य विधीवत धार्मिक विधीसह गोदावरी पूजनानंतर बरोबर १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा पार पडला.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती येणे ही घटना नाशिकच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. कुंभाच्या ध्वजारोहणाला आतापर्यंत कधीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अशा सर्वोच्च पदांवरील व्यक्ती आल्या नव्हत्या. मात्र यंदा प्रथमच राष्ट्रपती या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. ३० ऑक्टोबरपासून गोदावरीच्या तीरावर ३ दिवसीय विशेष यज्ञ आणि धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. आजच्या ध्वजारोहणानंतर उद्या १ नोव्हेंबरला श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती होईल.
श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२ मिनिटांनी गुरू ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश झाल्यापासून सिंहस्थ सुरू झाला आहे. यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी योग घेऊन आला आहे. साधारणतः गुरू ग्रह हा कोणत्याही राशीत १३ महिने कालावधीसाठी असतो. त्यामुळे सिंहस्थ सुद्धा १३ महिनेच असतो. परंतु यंदा सिंहस्थ हा २१ महिने इतक्या कालावधीचा राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह सरळ जातो किंवा वक्री होतो, म्हणजे मागील घरात परत येतो. आज ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू असला तरी दोन वेळा त्यात खंड पडणार आहे.