किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने एका तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. भररस्त्यात तरुणाची हत्या केल्यानंतर या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून, न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नेमकी ही घटना काय होती आणि न्यायालयाने कोणता निर्णय दिला? जाणून घ्या सविस्तर...
समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रस्त्यावरील किरकोळ वादातून पुण्यात तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९ जानेवारी २०२१ ला शुभम विलास डोंगरे यांची हत्या झाली होती. रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषी ठरलेल्या प्रत्येक आरोपीला जन्मठेपेसह १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास सुनावण्यात आला आहे.
सुनील शंकरराव शिंदे (वय ४२), सतीश शंकर शिंदे (वय ३८), बबन दगडू शिंदे (वय ५३), बाळू मारुती गोसावी (वय ४८), ऋषिकेश सुरेश शिंदे (वय ३३), दगडू ऊर्फ सुभाष अशोक खंडाभोर (वय ३२), शंकरराव अनंतराव शिंदे (वय ७२) आणि पंकज बाळू खंडाभोर (वय ३५, सर्व रा. मावळ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सरकारी पक्षाने खटल्यात १२ साक्षीदार तपासले. मृत तरुणाची आई आणि त्याचा भाऊ हे दोन प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच वैद्यकीय पुरावे हे दोष सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. माजी सैनिक विलास डोंगरे यांचा मुलगा शुभम याचा आरोपींशी रस्त्यावरून किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
या वादातून आरोपींनी सुरुवातीला त्याच्यावर हल्ला केला आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर लाकडी दांडके व इतर वस्तूंनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे ३० दिवस तो कोमात होता. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.