"त्याने ट्रक सुरू केला अन् होत्याचं नव्हतं झालं" नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नुकचीत उल्हासनगरमधून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. ट्रक खाली चिरडल्याने एका वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह रुग्णालयात दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंबरनाथ- उल्हासनगर महामार्गावर एक ट्रक उभा होता. एका वृद्ध व्यक्तीला फार भूक लागली होती. त्यामुळे तो ट्रकखाली असलेल्या सावलीत जेवायला बसला. तितक्यात ट्रक चालक तेथे आला. आपल्या ट्रक खाली कोणी आहे. याबद्दल त्याला किहीच माहिती नव्हते. त्याने ट्रक सुरू केला आणि होत्याचं नव्हतं झालं.

अवजड ट्रक सुरू झाल्याचं समजताच वृद्ध व्यक्तीने आरडाओरडा केला. मात्र वाहनचालकला काही कळण्याआधीच ट्रकखाली वृद्ध व्यक्ती चिरडला गेला. मिळालेल्या माहितीनुसार , संजय मिश्रा असं वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. ट्रकखाली चिरडल्याने त्यांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिश्रा यांच्या कुटुंबीयांना ही माहिती मिळाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली असून मोठा आक्रोश केला आहे. मिश्रा यांच्या निधनामुळे कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला असून पोलिसांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ट्रकसारख्या वाहनांखाली सावलीसाठी अनेक कुत्रे आणि मांजर देखील येऊन बसतात. वृद्ध आजोबांनी देखील सावलीसाठीच ट्रकखाली बसून जेवायचं ठरवलं. झालेली घटना ही दुर्दैवी असून हा एक अपघात आहे असे प्रथम पाहता समजते. दरम्यान, प्रत्येक वाहनचालकाने पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात आपल्या वाहनाखाली कोणी आहे की नाही याची खात्री केल्यावर वाहन चालवणे गरजेचे झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group