छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलाचे सतत ऑपरेशन सुरू असते. सुरक्षा दलाचे जवान बिजापूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गांगलूर परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी नेंद्रा कोरचोलीच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये आज (दि. २) सकाळी चकमक झाली. यात ४ नक्षलवादी ठार, तर ७ नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी चकमकीला दुजोरा दिला आहे. परंतु ठार आणि जखमी झालेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही. अजूनही चकमक सुरूच असल्याचे यादव यांनी सांगितले.
माहितीनुसार, नेंद्रा-कोरचोली जंगलात नक्षलवादी असल्याच्या माहितीवरून डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, बस्तर फायटर आणि सीएएफच्या जवानांनी गंगलूर पोलीस ठाण्यात संयुक्त कारवाई केली. सुरक्षा दलांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात ४ नक्षलवादी ठार झाले.
चकमकीच्या ठिकाणी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू केली आहे. 4-5 नक्षलवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींची संख्याही 6-7 असल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसोबतच जवानांनी INSAS, LMG आणि AK-47 रायफल्स सारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत.