शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडी कार्यालयाने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी अमोल कीर्तीकर यांना हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आलं आहे. अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे, त्यातच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना ईडीने समन्स दिलं होतं. आता निवडणुकीआधी त्यांची ईडी चौकशी होणार आहे.
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून ठाकरेंचे शिलेदार अमोल कीर्तीकर यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये याच कठीण खिचडी घोटाळा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. यामध्ये कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आता अमोल कीर्तीकर यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अमोल कीर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?
मुंबई महापालिकेत कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे शिलेदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात ईडी पुन्हा एकदा अमोल किर्तीकर यांची चौकशी करणार आहे. त्यामुळे आता अमोल किर्तीकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खिचडी घोटाळ्याची चौकशी
कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची चौकशी केली होती, त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडे असून अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
काय आहे खिचडी घोटाळा?
कोविड काळात स्वत:चे मुंबईत घर नाही अशा गरीब स्थलांतरीत कामगारांसाठी लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. या कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेनं 52 कंपन्यांना मुंबई दिलं होतं. दरम्यान, यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे.