काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नाना पटोलेंच्या कारला धडक देणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच ट्रक चालकाला देखील अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोवर्धन कुसरामला असं ट्रक चालकाचं नाव आहे. अपघातानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घातपात घडवण्याता प्रयत्न झाला असा आरोपही करण्यात आला होता. अशात आता ट्रक चालकाला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मंगळवारी रात्री भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ नाना पटोलेंच्या कारचा अपघात झाला होता. प्रचार आटोपून सुकळी गावाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये नाना पटोले थोडक्यामध्ये बचावले.
दरम्यान राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात हा अपघात झाल्याने अपघाताप्रकरणी काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे. कारला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.