छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २९ माओवाद्यांना ठार केलं. यात ३ जवान जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये बड्या नक्षली नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या चकमकीत माओवादी ठार झाले आहेत.
उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी म्हटलं की, ही चकमक मोठं यश आहे. याचं श्रेय धाडसी सुरक्षादलाला जाते. बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीनागुंडा आणि कोरोनार गावाच्या मध्ये हापाटोला गावातील जंगलात ही चकमक झाली. यात २९ माओवाद्यांना ठार करण्यात आलं. माओवाद्यांच्या विरोधातली देशातली दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.. तब्बल पाच ते सहा तास अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि माओवादी यांच्यात ही चकमक सुरू होती. लाईव्ह व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती या चकमकीचा व्हिडिओ आला आहे. यावेळी जंगलात होणारा गोंधळ, जंगलात जवानांची होणारी हालचाल आणि केला जाणारा गोळीबार दिसून येत आहे.
सुंदरराज यांनी सांगितलं की, सुरक्षादलाला शंकर, ललिता, राजू यांच्यासह इतर माओवादी जंगलात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सीमा सुरक्षा दल, जिल्हा रिजर्व गार्ड यांच्या संयुक्त दलाने कारवाई केली. मंगळवारी दुपारी दोन वाजता हापाटोला गावातील जंगलात माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या माहितीनुसार घटनास्थळी २९ माओवाद्यांचे मृतदेह, एके४७ रायफल, एसएलआर रायफल, इंसास रायफल आणि ३०३ बंदुकींसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. नक्षलग्रस्त बस्तर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. तर कांकेर मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होईल.