सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेकदा हे व्हिडिओ मनोरंजक असतात पण कधी कधी हे व्हिडिओ सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या प्रचंड संतापाचे कारण ठरतात. ब्राझील येथील एका महिलेचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जो पाहून नटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
ब्राझीलची राजधानी रिओ डी जानेरिओमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर बँकेमध्ये आणलं होतं. कर्ज मंजूर व्हावं यासाठी मृत व्यक्तीची स्वाक्षरी करुन घेण्यासाठी महिला प्रयत्न करत होती. महिला मृत व्यक्तीची पुतणी असल्याचं कळतंय. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी महिलेच्या निर्दयीपणावर टीका केली आहे.
महिला मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहोचली. व्हिलचेअरवर बसलेला व्यक्ती कोणतीही हालचाल न करता बसलेला असतो. त्याची मान देखील पडलेली असते. अशावेळी महिला त्याची मान सरळ करते, त्याच्या हातात पेन देते आणि समोर असलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करवून घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, व्यक्ती मृत झाला असल्याने तिला प्रतिसाद मिळत नाही. बँकेतील कर्मचाऱ्यांना संशय येतो. यावेळी बँक कर्मचाऱ्यांकडून पोलिसांना फोन केला गेला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांना देखील पाचारण करण्यात आलं.
डॉक्टरांनी व्हिलचेअरवर बसलेल्या व्यक्तीची तपासणी केली. त्याचा काही तासांपूर्वी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीचे नाव पॉल रॉबर्टो ब्रागा (वय ६८) आहे. महिलेचे नाव इरिका डीसुझा असल्याचं कळतंय. ती मृत व्यक्तीची पुतणी असून केअरटेकर म्हणून ती काम करायची.
बँक कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी सदर प्रकाराचा व्हिडिओ शूट केला होता. महिलेला काकाच्या बँक खात्यातून कर्ज मंजूर करुन घ्यायचे होते. मृत व्यक्ती हा पेंशनर होता. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी महिला धडपडत होती.
बँक कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तीबाबत विचारणा केली, पण महिलेने उडवाउडवीचे उत्तरं दिली. माझं डोकं खाऊ नको, गप स्वाक्षरी कर असं ती मृत व्यक्तीला म्हणत होती. व्हिडीओत महिला मृत व्यक्तीला पेन व्यवस्थित पकडण्यास आणि कागदावर सही करण्यास सांगताना दिसत आहे. यावेळी तिने पेन उचलून मृत व्यक्तीच्या हातात ठेवला होता. यावेळी उपस्थित असणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याने महिलेला सांगितलं की, 'हे कायदेशीर नाही. त्याची प्रकृती चांगली दिसत नाही. तो फार थकला आहे आणि रंगही बदलला आहे'.
यावर तिने उत्तर दिलं की, 'हा आधीपासूनच असा आहे'. यानंत तिने मृत व्यक्तीकडे पाहून म्हटलं की, 'जर तुमची प्रकृती नीट नसेल तर मी तुम्हाला रुग्णालयात नेते. तुम्हाला मी पुन्हा रुग्णालयात नेऊ का?'. व्हिडीओत मृत व्यक्तीचं डोकं वारंवार मागे पडताना दिसत आहे. यावेळी महिला त्याला इथे स्वाक्षरी करा, सारखा मला त्रास देऊ नको असं दरडावताना दिसत आहे.
यानंतर महिलेला घटनास्थळावरुन अटक करण्यात आली आहे. आपण त्याचे नातेवाईक असल्याचाही महिलेचा दावा आहे. अधिकारी बँकेच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. हा एखादा मोठा घोटाळा आहे का याचाही तपास करत आहेत.
मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी शवविच्छेदन केलं जात आहे. पोलिसांनीही बँकेत आणण्याआधी व्यक्तीचा मृत्यू झाला होता याला दुजोरा दिला आहे. दरम्यान मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची माहिती मिळवली जात आहे. कर्जासाठी अर्ज केला तेव्हा तो जिवंत होता का याचीही माहिती मिळवली जात आहे.