जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी उद्योगधंद्यांचा उल्लेख येतो तेव्हा त्यात गोदरेज कुटुंबाचे नावही येते. या कुटुंबाचा व्यवसाय रिअल इस्टेटपासून ते ग्राहकोपयोगी उत्पादनांपर्यंत पसरला आहे, मात्र आता या 127 वर्षांच्या कुटुंबाची विभागणी झाली असून गोदरेज समूहाचा व्यवसाय दोन भागात विभागला गेला आहे.
127 वर्षे जुने गोदरेज कुटुंब आता दोन भागात विभागले गेले आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचे हक्क मिळाले आहेत. त्यात पाच लिस्ट कंपन्या आहेत. आदि गोदरेजचे चुलत भाऊ जमशेद आणि स्मिता यांना लिस्ट नसलेल्या कंपनी गोदरेज अँड बॉयसची मालकी मिळणार आहे. या दोघांना गोदरेज अँड बॉयसशी संबंधित कंपन्यांसह मुंबईत मोठा भूखंड आणि महत्त्वाची मालमत्ता मिळणार आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस समूहाने जारी केलेल्या निवेदनानुसार, समूह संस्थापक कुटुंबाच्या दोन शाखांमध्ये विभागला गेला आहे. एका बाजूला आदि गोदरेज (82) आणि त्याचा भाऊ नादिर (73) आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज (75) आणि स्मिता गोदरेज कृष्णा (74) आहेत.
गोदरेज कुटुंबाने विभाजन प्रक्रियेचे वर्णन गोदरेज कंपन्यांमधील भागधारकांच्या मालकी हक्कांची पुनर्रचना म्हणून केले आहे. दोन्ही गट गोदरेज ब्रँड वापरणे सुरू ठेवतील, असे निवेदनात म्हटले आहे.
गोदरेज ग्रुपची स्थापना अर्देशीर गोदरेज यांनी 1897 मध्ये केली होती. त्यांचा कुलूप बनवण्याचा व्यवसाय होता, त्यापूर्वी हाताने वैद्यकीय उपकरणे बनवण्याच्या व्यवसायात ते अपयशी ठरले होते. अर्देशीरला मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांचा व्यवसाय त्यांचा भाऊ पिरोजशा गोदरेज यांच्या हाती आला.
पिरोजशा गोदरेज यांना सोहराब, डोसा, बुर्जोर आणि नवल असे चार मुलं होते. अनेक वर्षांनंतर, समूहाचा व्यवसाय बुर्जोर यांचा मुलगा आदि आणि नादिर तसेच नवलचा मुलगा आणि मुलगी जमशेद आणि स्मिता यांच्या हातात आला. सोहराबला मुलगा नव्हता, तर डोसाला एक मुलगा होता, रिशाद, ज्याला मूलबाळ नव्हते. आता 127 वर्षांनंतर समूहाच्या व्यवसायाची विभागणी होत आहे.