नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या ७ मे रोजी तिसऱ्यांदा अवकाशामध्ये झेप घेणार होत्या. पण, तांत्रिक कारणामुळे त्यांची ही अवकाश भरारी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
केनेडी स्पेस सेंटर येथून बोइंग स्टार लाइनर हे नवे अंतराळयान सुनीता यांना घेऊन सकाळी आठच्या सुमारास उड्डाण करणार होते. सुनीता या आपल्यासोबत भगवदगीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत घेऊन जाणार होत्या. पण, तुर्तास सुनीता यांना तिसऱ्यांदा अवकाशात जाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. नेमका काय तांत्रिक दोष निर्माण झाला होता हे कळू शकलेलं नाही.
सुनीता या अवकाश झेप घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. त्या तिसऱ्यांदा अवकाशात झेपावणार होत्या. पण, अंतराळयान उड्डाण करण्याच्या फक्त ९० मिनिटांआधी ही मोहीम थांबवण्यात आली. अमेरिकेची अवकाश संस्था नासाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळयानातील ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व व्यवस्थित काम करत नव्हती. त्यामुळे मोहीम पुढे न नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
विल्यम्स आणि नासाच्या बॅरे विलमोर हे बोइंग स्टार लाइनरमधून अवकाशात झेप घेणार होते. पण, मोहीम स्थगित करण्यात आल्याने त्यांना अंतराळयानाच्या बाहेर यावे लागले. ही मोहीम नंतर राबवली जाईल. मात्र, पुढील तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असं नासाकडून सांगण्यात आलं आहे. सुनीता विल्यम्स यांच्या अवकाश मोहिमेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.