नवी दिल्ली :- फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यामुळे पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीचे संस्थापक रामदेव आणि बाळकृष्ण अडचणीत आले.
सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर आता पतंजलीसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. पतंजली कंपनीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे उत्तराखंडमधील पिथोरागडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांवर कारवाई केली आहे. तिघांनाही सहा महिन्यांचा कारावास आणि दंड अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे.
पाच वर्षांपूर्वी अन्न सुरक्षा निरीक्षकांनी पिथोरागडच्या बेरीनागमधील मुख्य बाजारपेठेतील लीलाधर पाठक यांच्या दुकानाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या दुकानातील काही खाद्यपदार्थांची तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांनी दुकानातील पतंजली नवरत्न इलायची सोनपापडीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर दुकानातील सोनपापडीचे काही नमुने त्यांनी गोळा केले. यासह रामनगर येथील ‘कान्हा जी’ या वितरकाला आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती.
अन्न सुरक्षा निरीक्षकांनी बेरीनागपाठोपाठ रुद्रपूर, उधम सिंह नगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजली सोनपापडीचे नमुने गोळा केले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली. या प्रयोगशाळांनी डिसेंबर २०२० मध्ये राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला पतंजलीच्या सोनपापडीची निकृष्ट गुणवत्ता दर्शवणारा अहवाल पाठवला. त्यानंतर व्यावसायिक लीलाधर पाठक, विरतक अजय जोशी आणि पतंजलीचे सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
सुनावणीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या तिघांना अनुक्रमे, ५,००० रुपये, १०,००० रुपये आणि २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.