श्रीगोंदा : पावसात पडलेल्या विद्युत पोलच्या तारांमध्ये चालू असलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका शेतकऱ्यासह दोन शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील वाळके वस्ती परिसरात घडली. या घटनेने बेलवंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेलवंडी गावातील वाळके वस्ती वरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे सकाळीच शेळ्या घेऊन नदीच्या कडेला चरायला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल रात्रीच्या पावसात पडले होते. विजेचे पोल पडून सुमारे 18 तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा चालू होता. दुपारी अडीच च्या सुमारास शेळ्या चरत असताना तारेजवळ गेल्या आणि त्यांना करंट लागला.
यावेळी संभाजी वाळके हे देखील जवळच असल्याने त्यांना देखील या विद्युत तारेचा मोठा शॉक लागला त्यामुळे ते जागीच मयत झाले. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ जवळच असणाऱ्या विद्युत ट्रान्सफार्मारचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कैलास शिपणकर, नंदकुमार पठारे यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करत रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.