देवळ्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार नंदुरबार येथुन ताब्यात
देवळ्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार नंदुरबार येथुन ताब्यात
img
दैनिक भ्रमर

देवळा (भ्रमर वार्ताहर) :- येथील ज्ञानेश्‍वरनगर (वाखारी रोड) मध्ये दि 18 जुलै रोजी भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीतील आरोपीला पकडण्यात देवळा पोलिसांना यश मिळाले असून, त्याला आज पहाटे 4 वाजता अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की देवळा येथील  ज्ञानेश्‍वरनगर (वाखारी रोड) परिसरात राहणारे आदेश बोअरवेलचे संचालक आदेश ठाकरे यांच्या बंगल्यात दि. 18 जुलै रोजी  सकाळी 9 वाजेच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली होती. यात रोख दीड लाख रुपये व 15 तोळे सोने असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला होता. चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. तपासासाठी,  तसेच घटनास्थळी नाशिकहून फिंगरप्रिंट व डॉग पथकालादेखील  पाचारण करण्यात आले होते.

गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी नंदुरबार येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. नंतर देवळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी हे गेल्या तीन दिवसांपासून दिवसरात्र आरोपीवर पाळत ठेवून होते. चिकाटीने त्यांनी आरोपी जिमी बिपीन शर्मा ऊर्फ दीपक (वय 31, रा. नंदुरबार) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

जिमी शर्मा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर महाराष्ट्र व हरियाना येथे घरफोड्या व चोर्‍या करणे असे एकूण 42 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. आरोपीने त्याच्याकडील मुद्देमालाची दिल्लीत विक्री केल्याची माहिती मिळाली आहे.


deola |
इतर बातम्या
Join Whatsapp Group