नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक कारवाया तसेच राजकीय अस्थिरता यामुळे गांजलेले काही हजार लोक भारतालगतच्या सीमेवर जमा झाले होते. तिथून त्यांनी बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न गुरुवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला.
आम्हाला भारतात आश्रय द्या, अशी विनंती हे बांगलादेशी नागरिक करत आहेत.हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले. बांगलादेशच्या हद्दीत जमा झालेल्या हजारो नागरिकांशी संवाद साधून, त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठविण्यात आले.
बांगलादेशमधील जनतेच्या हिताला भारत देतो प्राधान्य
बांगलादेशच्या जनतेच्या हिताला आम्ही प्राधान्य देतो. त्या देशात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे भारताने गुरुवारी सांगितले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली.
'भारतात अस्थिरतेचा प्रयत्न सुरू''
बांगलादेशमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भारतात अस्थिरता व तेथील जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काही प्रवृत्तींचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख शांताकुमारी यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील राष्ट्रसेविका समिती ही महिला संघटना आहे.
मुख्यमंत्री शिंदेंची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा
मुंबई : राज्यातील विद्यार्थी, अभियंत्यांना मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.