भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात गावात युव संकल्प मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढविण्याची चाचपणी करत आहेत.
त्यांनी काल संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.
त्यांच्या विधानानंतर आता संगमनेर तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट स्टेजवर चढून ठिय्या मांडला आणि देशमुख यांनी सदर विधानाबाबत माफी मागण्याची मागणी लावून धरली.
देशमुख यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते रात्री आक्रमक झाल्याचे दिसले. सभेनंतर विखे यांच्याबरोबरचे लोक लोणी गावी परतत असताना त्यांच्या वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड केली. सभेचे आयोजक व संबंधित वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून अटक करावी, या मागणीसाठी मध्यरात्रीनंतरही हजारोंचा जमाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या देऊन बसला होता.
मध्यरात्रीनंतरही हा संतप्त जमाव पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मारून होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आजही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
या घटनेवर विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक्सवर पोस्ट करून संताप व्यक्त केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांनी याच वसंतराव देशमुख यांचा चांगला समाचार घेतला होता. याची आठवण करून देताना या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशा लोकांना त्यांची जागा दाखविण्याची.