सुजय विखेंच्या आव्हानाला निलेश लंकेच संसदेतून उत्तर; राज्याच्या राजकारणात बनला चर्चेचा विषय
सुजय विखेंच्या आव्हानाला निलेश लंकेच संसदेतून उत्तर; राज्याच्या राजकारणात बनला चर्चेचा विषय
img
Jayshri Rajesh
निलेश लंके यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीतून घेतलेल्या शपथेची अहमदनगर जिल्ह्यात जोरदार चर्चा होतेय. 

18 व्या लोकसभेच्या सदस्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यात महाराष्ट्रासह देशभरातील खासदारांनी शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेणं पसंत केलं. मात्र अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. 

निलेश लंके हे आधी पारनेरचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आले आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. या लढतीची राज्यभर चर्चा झाली. सुजय विखे पाटील विरूद्ध निलेश लंके या लढतीत लंकेंचा विजय झाला. आज त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.

लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांच्या आव्हानाला संसदेतून उत्तर दिलं आहे. निलेश लंके यांनी यांनी इंग्रजीतून घेतलेली शपथ, अहमदनगरसह राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

सुजय विखे यांच काय होतं आव्हान ?

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं होतं. या मेळाव्यात सुजय विखे संसदेत इंग्रजीत भाषण करतानाचा एक व्हीडिओ दाखवण्यात आला होता. तेव्हा समोरच्या उमेदवाराने एक महिना पाठांतर करून तरी असं इंग्रजी बोलून दाखवलं तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते. त्यांच्या याच आव्हानाला आता निलेश लंके यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group