केंद्र सरकारने आज तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने बजेटमधून गोरगरीबांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. केंद्र सरकारने एक दोन नव्हे तर गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्रि केली आहेत. त्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा अर्थसंकल्प मांडताना रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारामन यांनी 36 जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. सहा जीवन रक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी 5 टक्के करण्यात आली आहे.
मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवणार
निर्मला सीतारामन यांनी मेडिकल कॉलेजात अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. 5 वर्षात 10 हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. IITमध्ये 6500 सीटें वाढवण्यात येणार आहेत आणि 3 AI सेंटर उघडण्यात येणार आहेत. AI शिक्षणासाठी 500 कोटीचा बजेट ठेवण्यात आला आहे.
देशात वैद्यकीय शिक्षणाची नेहमीच मारामार असते. अनेक तरुणांना सीट नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेता येत नाही. परिणामी त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न अर्धवट राहतं. वैद्यकीय शिक्षणाच्या जागा कमी असल्यामुळे विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहतात. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, ती मुलं खासगी मेडिकल कॉलेजात शिकतात. मात्र, गरीब कुटुंबातून आलेली मुलं वेगळ्या फिल्डला जातात.
आता निर्मला सीतारामन यांनी मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी येत्या 5 वर्षात मेडिकलच्या 10 हजार जागा वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी गोष्ट ठरणार आहे. या विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय कॉलेजात शिक्षण मिळणार असून त्यांना प्रायव्हेट कॉलेजात पैसा खर्च करण्याची गरज पडणार नाही.