छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 20 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 25 महिलांसह एकूण 223 उमेदवार रिंगणात आहेत. ज्यांच्यासाठी एकूण 40,78,681 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 5,304 निवडणूक केंद्रे तयार करण्यात आली असून 25,249 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, सुकमाच्या तोंडामार्का भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. छत्तीसगड निवडणूक ड्युटीवर हा शिपाई तैनात होता. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
काल (सोमवार) देखील नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या कानखेड जिल्ह्यात आयईडी स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन मतदान कर्मचारी जखमी आहेत. सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवानही जखमी झाला आहे. ही घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली.
त्यावेळी सुरक्षा दलांच्या निगराणीखाली चार मतदान पक्ष आपापल्या मतदान केंद्राकडे जात होते. ही घटना लहानबेठिया पोलीस ठाण्यांतर्गत घडली.