रिक्षाचालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुण्यातील रिक्षाचालकांसाठी आरटीओकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. पुण्यातील चालकांसाठी युनिफॉर्म अनिवार्य करण्यात आलाय. ज्या रिक्षाचालकांकडे गणवेश नसेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
मार्गावर सेवा पुरवताना रिक्षाचालकांना आता पांढरा शर्ट आणि खाकी पँट, असा गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे.
तसेच गणवेशासोबत ओळखपत्र प्रदर्शित करणेही बंधनकारक असणार आहे. गणवेश, ओळखपत्र नसल्यास रिक्षाचालकांवर आरटीओच्या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात परिपत्रक आरटीओकडून काढण्यात आलंय.
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रिक्षाचालकांची ओळख पटावी, त्यासाठी महाराष्ट्र कायदा वाहन नियम 1989 चे नियम 21 पोटनियम 18 मध्ये रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा पुरवताना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे. काही रिक्षाचालक या नियमांचे पालन करीत नाहीत.
रिक्षाचालक पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट असा गणवेश परिधान करीत नाहीत, असं आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी पत्रक प्रसिद्ध केलंय. रिक्षाचालकांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचं भोसले यांनी पत्रात म्हटलयं.