अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, अशातच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गुरुवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. दर्यापूर येथून प्रवाशांना घेऊन रामगाव मार्गे कोळंबीला निघालेली रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नदीपात्रात कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने नजीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. सुखदेव इंगळे (वय ७०, राहणार कोळंबी) असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या नदीपत्रावरील पुलाला संरक्षण भिंत नसल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. सदर घटनेने परिसरात एकर खळबळ उडाली असून आता या घटनेचा पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहे.
गुरुवारी दर्यापूर येथे आठवडी बाजार होता. या बाजाराला तालुक्यातील काही नागरिक आले होते. यावेळी बाजार करून रिक्षाने परतत असताना रामगाव येथील चंद्रभागानदी पात्राजवळ सदर रिक्षाचालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले. काही क्षणातच रिक्षा थेट नदीत जाऊन कोसळली. यात १५ पैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.