जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
खोऱ्यात राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून संभाव्य दहशतवादी हल्ल्यांबाबत विश्वसनीय गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानशी संबंध असलेल्या दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली होती. तरीही पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षेत अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे. हा हल्ला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झाला होता. त्यानंतर महामार्ग आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये अतिरिक्त चौक्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
प्रमुख प्रतिष्ठान आणि पर्यटक आकर्षण स्थळांच्या जवळ जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच गुप्तचर माहितीनंतर महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सैन्य दहशतवाद्यांना शोधून काढताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ‘दहशतवादविरोधी मोहीम’ राबवण्यात आल्या आहेत. तसेच दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आले.
केंद्र सरकार दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी कारवाईच्या मोडमध्ये दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना कठोर इशारा देताना म्हटले, ‘या दहशतवादी हल्ल्यात कोणाचा मुलगा शहीद झाला, कोणाचा भाऊ, कोणाचा जीवनसाथी मारला गेला. त्यापैकी कोणी बंगाली बोलत होता, कोणी कन्नड बोलत होता, कोणी मराठी होता, कोणी ओडिया होता, कोणी गुजराती होता, कोणी बिहारचा होता. आमचा संताप एकसारखा आहे. हा हल्ला केवळ निशस्त्र पर्यटकांवर झाला नाही, तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.’
त्यांनी पुढे म्हटले, ‘आज कोणी असा समज करू नये की आमच्या 27 लोकांना मारून ते ही लढाई जिंकले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की प्रत्येकाला उत्तर दिले जाईल. त्यांना शोधून शोधून धडा शिकवला जाईल. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे.’