काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर भागात राहणार्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न नागरीकांच्या सतर्कतेमुळे फसल्याची घटना ताजी असतानाच उपजिल्हा रुग्णालयात देखील अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालयात लहान बाळाला लस देण्यासाठी आलेल्या महिलेच्या तीन वर्षीय मुलीला अपहरण करून घेऊन जात असतानाच नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. अन् अपहरण करणार्या तरूणाला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लहान मुलाला नियमीत डोस देण्यासाठी छाया प्रवीण निकाळे या सोबत तीन वर्षीय मुलीला घेवून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आल्या असता रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेऊन रुग्णालयातील एका व्यक्तीने अपहरणाच्या उद्देशाने या तीन वर्षीय मुलीला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी जोरात रडायला लागल्याने रुग्णालयातील लोकांना संशय आला आणि त्या तरूणाकडे विचारपूस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
यामुळे नागरिकांना तरुण चिमुरडीचे अपहरण करत असल्याचा संशय आला. नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.जय पुरुषोत्तम वैराळे (रा. तालुका शिवर, जिल्हा अकोला) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.