नाशिकरोड (प्रतिनिधी) :- चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेला जवळ बोलावून तिच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणास रहिवाशांच्या सतर्कतेने पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पाच वर्षीय बालिका ही बिटको कॉलेजमागील एका मळ्यात उच्चभ्रू सोसायटीत राहते. या सोसायटीत ती काल (दि. 21) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सोसायटीतील घरोघरी असलेल्या गणरायाच्या आरतीसाठी ती इतर मुलांबरोबर आली होती. तसेच काल गौराईचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र रेलचेल सुरू होती.
आरतीनंतर ही मुलगी घरी जात असताना परप्रांतीय संशयित महिर मनोज बर्मन (वय 23, रा. ओडीपतोरा, ता. उजीहरा, जि. सतना, मध्य प्रदेश) या तरुणाने सोसायटीच्या आवारात प्रवेश केला. त्याने या अल्पवयीन बालिकेला चॉकलेट दाखविले. चॉकलेटच्या आमिषाने ही बालिका त्याच्याजवळ आली. काही कळण्याच्या आतच त्याने या बालिकेला कडेवर उचलून घेऊन जात असताना ही बाब तेथे उपस्थित असलेल्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना गोळा केले.
त्यानंतर संशयिताला मोठ्या शिताफीने अडवले व त्याच्या ताब्यातून या मुलीची सुटका केली. यानंतर ही माहिती उपनगर पोलीस ठाण्यास कळविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी पकडून ठेवलेला आरोपी महिर बर्मन याला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.