पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवार पेठेतील सराफी पेढीतून ४ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे. मात्र धक्कादायक बाब अशी की ही चोरी करणारा चोर हा इंजिनियर टॉपर असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलीसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी या इंजिनियर चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुण्यातील बुधवार पेठेतील दागिन्यांच्या दुकानातील वॉशरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करुन चोराने दुकानातील एकुण ४ लाख ७४ हजार रुपये किमतीचे फॉर्मिंग ज्वेलरीचा माल चोरला. याबाबत दुकान मालकाने दुसऱ्यादिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलीस तपास करत असताना पोलिसांनी २३० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित वाटणाऱ्या व्यक्तीचा मागोवा घेत पोलीस कर्नाटक पर्यंत पोहचले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून लोकल पोलिसांच्या मदतीने आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या बॅगेत इंजिनिअरिंग कॉलेजचे आयकार्ड आणि मोबाईल सापडला.
कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी तसेच त्याच्याजवळ सापडलेल्या वस्तूंवरून आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीने दागिने चोरल्याचे कबुल केले असता आरोपीकडे सापडलेले १ ग्रॅम सोन्याचे वेगवेगळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण ४लाख ७४ हजार रुपायांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान पोलीस चौकशीत आरोपीने बारावी विज्ञान शाखेत उत्कृष्ट गुण मिळवून सरकारी कोट्यातून कर्नाटकातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
मात्र, घरची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने त्याने शिक्षण अर्धवट सोडून चोरीचा मार्ग स्वीकारला असल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.