२० रुपयाचा वडापाव खाण्यासाठी थांबणं पडलं महागात ;  काय आहे प्रकरण?
२० रुपयाचा वडापाव खाण्यासाठी थांबणं पडलं महागात ; काय आहे प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
पुण्यात एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. या पिशवीत 195 ग्रॅम सोन होतं, ज्याची किंमत जवळपास 14 लाख आहे. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मांजरीमध्ये राहणारे दशरथ धामणे आणि त्यांच्या पत्नी जयश्री धामणे यांनी बँकेत तारण ठेवलेलं 195 ग्रॅम सोनं सोडवून आणलं होतं. घऱी परतत असताना त्यांनी दागिन्यांची पिशवी स्कूटरच्या पुढच्या बाजूला लटकवली होती. 

रस्त्यात ते नातवंडांना वडापाव घेण्यासाठी हडपसर मधील रोहित वडेवालेसमोर थांबले होते. दशरथ धामणे वडापाव घ्यायला गेले असता त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या. तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने संधी साधत त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. 

आरोपीने जयश्री यांना  तुमचे पैसे मागे पडल्याचं सांगून त्यांचं लक्ष विचलित केलं. जयश्री पैसे पडलेत का पाहण्यासाठी खाली उतरल्या असता चोराने संधी साधली आणि गाडीच्या हुकला लटकवलेली दागिन्यांची पिशवी घेऊन तो पसार झाला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

धामणे यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या आणि इतर दागिने मिळून जवळजवळ 195 ग्रॅम सोनं चोरीला गेलं आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group