UPI आता केवळ एक तांत्रिक सुविधा राहिलेली नाही, तर ती भारताच्या डिजिटल जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्रणाली अधिक वेगवान आणि सुरक्षित बनवण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. NPCI ने डिजिटल व्यवहारात सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने नव्या अटी जाहीर केल्या आहेत. फोनपे, गुगल पे, पेटीएमसारख्या अॅप्समधून व्यवहार करणाऱ्यांना याचा थेट परिणाम भोगावा लागणार आहे.
'या' ४ महत्वाच्या नियमात होणार बदल
1) आता तुम्ही दिवसातून केवळ ५० वेळा बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकता.
2) एका व्यवहाराचा स्टेटस फक्त ३ वेळा तपासता येईल आणि प्रत्येक वेळेस किमान ९० सेकंदांचं अंतर असणं आवश्यक असेल.
3) Netflix, EMI किंवा वीजबिल यांसारखे Auto Payment व्यवहार ठरलेल्या वेळेनुसारच प्रक्रिया होतील.
4} तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसात जास्तीत जास्त २५ वेळा पाहता येईल.
तुमच्या व्यवहारांवर काय परिणाम?
साधारणपणे ज्या वापरकर्त्यांकडून दिवसात अनेक वेळा बॅलन्स तपासला जातो, किंवा वारंवार व्यवहाराची स्थिती पाहिली जाते, त्यांना आता या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. सामान्य वापरकर्त्यांसाठी, जे दिवसातून एक-दोन व्यवहार करतात, याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
व्यापारी किंवा सेवा पुरवठादारांना मात्र ऑटोमेटेड पेमेंटची वेळ नव्याने ठरवावी लागणार आहे. म्हणजेच, पूर्वी दिवसभरात कधीही होणारे ऑटो पेमेंट्स आता ठरावीक तीन वेळातच पूर्ण होतील.