दुखलं-खुपलं की सर्रास
दुखलं-खुपलं की सर्रास "हे" औषध घेताय? मग सावधान....., केंद्र सरकारनं दिलाय गंभीर इशारा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : अंगदुखी, दातदुखी तसेच, काहीही दुखलं खुपलं की, अगदी सर्रास मेफ्टल स्पा या औषधाचं सेवन केलं जातं. पेनकिलर म्हणून वापरलं जाणारी मेफ्टल स्पा प्रत्येक घरात असतेच. पण आता याच औषधाबाबत सर्वांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

भारतीय फार्माकोपिया कमिशन नं मेफ्टल संदर्भात औषध आणि सुरक्षेबाबतचा इशारा दिला आहे. तसेच, नमूद केलं आहे की, मेफ्टलमध्ये असलेलं मेफेनामिक अॅसिड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कालांतरानं या औषधामुळे गंभीर दुष्परिणामांचाही सामना करावा लागू शकतो. मेफ्टलच्या सेवनानं इओसिनोफिलिया आणि सिस्टीमिक लक्षणे सिंड्रोम होऊ शकतो.

मेफेनॅमिक ॲपल-आधारित पेनकिलर मेफ्टल स्पाचा उपयोग संधिवात, हाडांचे रोग ऑस्टियोआर्थरायटिस, मुलींना होणाऱ्या मासिक पाळीतील वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी केला जातो.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, आयपीसीनं सुरक्षेसंदर्भात इशारा देताना म्हटलं आहे की, फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PVPI) डेटाबेसमधून मेफ्टलच्या दुष्परिणामांच्या प्राथमिक विश्लेषणात DRESS सिंड्रोम उघड झाला आहे.

DRESS सिंड्रोम म्हणजे काय?
ड्रेस सिंड्रोम ही काही औषधांमुळे होणारी गंभीर ॲलर्जी आहे. त्यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठतात, ताप येतो आणि लिम्फ नोड्स सुजतात. हे औषध घेतल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांच्या दरम्यान ही ॲलर्जी होऊ शकते.

30 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये केंद्र सरकारनं असं म्हटलं आहे की, "डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांना मेफ्टल स्पा या औषधाच्या वापरानंतर जाणवणाऱ्या दुष्परिणामांच्या शक्यतांचं बारकाईनं निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

" तसेच, पुढे सांगितलं आहे की, "औषध घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिसली तर तुम्ही वेबसाईट www.ipc.gov.in किंवा Android मोबाईल अॅप ADR PvPI आणि PvPI हेल्पलाइनद्वारे एक फॉर्म भरू शकता आणि अंतर्गत तक्रार नोंदवू शकता. PvPI च्या राष्ट्रीय आयोग समन्वय केंद्राकडे प्रकरणाचा अहवाल द्या."

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group