संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या पुंडलिक नगरातील ऑफिसबाहेर ही दगडफेक केल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दगडफेकीमुळे अतुल सावे यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री अतुल सावे यांच्या कारवर संभाजीनगरमध्ये दगडफेक करण्यात आली. अतुल सावे पुंडलिकनगर येथील कार्यालयात बसले होते. कार्यालयाबाहेर त्यांची कार उभी होती. या कारवर एकाने दगडफेक केली. दगडफेक करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर संभाजीनगरमधील एका ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. गणेश सखाराम शेजुळ असं आरोपी व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती मूळची जालना जिल्ह्यातील असून सध्या संभाजीनगरमधील हनुमाननगरमध्ये राहते. या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.