राज्यभरात पावसाने एकच हाहा:कार केल्याचे चित्र आहे. त्यातच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढलं आहे. याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. गावांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरु आहे. अशातच धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचे बघायला मिळाले आहे.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात मदत केली आहे. दोन वर्षांचा नातू आणि आजी पुरात अडकले होते. त्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रशासनाला मिळाली. दोघांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. खासदार निंबाळकरही घटनास्थळी आले. परिस्थिती बघून एनडीआरएफच्या जवानांसह खासदार ओमराजे निंबाळकरही पुरात उतरले आणि दोन वर्षांच्या नातवासह आजीला बाहेर काढण्यासाठी मदत केली.
ओमराजे निंबाळकर यांचा या मदतीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. सोशल मीडियावर ओमराजे यांचे तोंडभरून कौतुक केले जातय. असा खासदार पुन्हा होणार नाही. दादांना मतदान केल्याचे समाधान मिळाले, यासारख्या कमेंट्स केल्या जात आहेत. रात्रीच्या वेळी अक्षरशः गळ्यापर्यंत पाण्यात उतरून गेले २ दिवस ओमराजे निंबाळकर जनतेच्या मदतीला उतरले आहेत. अशी मदत करणारा हा पहिलाच लोकप्रतिनिधी असेल, धाराशिव जिल्ह्याचं खरंच नशीब आहे, यासारख्या कमेंट्स् सोशल मीडियावर येत आहेत.