धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आहे. अशातच आता धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दोन्ही उमेदवारांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
धाराशिव लोकसभेसाठी महायुतीकडून भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारसभांचा धडाका सुरू केला आहे. अशातच ओमराजे निंबाळकर यांना केंद्रिय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
एका सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडून १८ कोटी रुपये घेतले असा आरोप राणाजगजितसिंह पाटील यांनी केला होता. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांनी ५००/१००० रुपये देऊन गर्दी जमा केल्याची तक्रारही ओमराजेंनी केली होती.
दरम्यान, हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजेंची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी नोटीस जारी केली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहेत.