अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय. ही घटना आयोवामधील पेरीच्या हायस्कूलमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या, तेव्हा पहिल्याच दिवशी शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. आयोवा येथील पेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
अमेरिकेच्या आयोवा राज्यात घडलेल्या या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेतील संशयित शूटरने स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
आयोवा येथील पेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी मिच मॉर्टवेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान या गोळीबारात ५ जण जखमी झाले असून त्यापैकी सहाव्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पेरी स्कूलच्या प्राचार्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. एका पीडिताची प्रकृती गंभीर आहे, तर इतर चार जणांची प्रकृती स्थिर आहे.