पुण्यातील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यात युवक काँग्रसच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. शाळेच्या आवारातील टपऱ्यांवर कारवाईचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. पुण्यातील बेकायदेशीर बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जे बार आणि पब बेकायदेशीर आहेत त्यांच्यावर बुलडोजर चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या पब आणि बार विरोधात कारवाई केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले की, ‘पुणेच नाही तर महाराष्ट्रात जिथे जिथे ड्रग्ज विकत असतील अशा लोकांना सोडणार नाही. त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. अशा हॉटेल, टपऱ्या असतील सर्वावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’
‘कुणाला पाठिशी घालण्याचं काम केलं तरी सोडणार नाही.ड्रग्जमुळे युवा पिढी चुकीच्या मार्गावर जात आहेत. शाळेच्या आजुबाजुला जिथे टपऱ्या असतील त्या उद्धवस्त करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. ड्रग्ज विकणाऱ्या गँगना सोडणार नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.’
ड्रग्स प्रकरणावर काँग्रेस आक्रमक
पुण्यातील ड्रग्स प्रकरणानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. पुण्यातील गुडलक चौकात युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात होणाऱ्या ड्रग्स पार्टीच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केलंय. पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे हे आंदोलन होते.
L3 बार पार्टी प्रकरणात पोलीस कोठडी
L3 बार पार्टी प्रकरणात नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्सचे सेवन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रविवारी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्सचे सेवन केल्याचा आरोप या दोन जणांवर आहे. आज दुपारी या दोघांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापैकी एकाला मुंबईतून तर दुसऱ्याला पुण्यातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासले जाणार आहेत.