दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस होता. मात्र, आंदोलनस्थळावरुन त्यांना हटवल्याची माहिती मिळतेय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जंतर-मंतरवर दिसतोय. पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईनंतर जंतर-मंतरवर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळतंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरुन हटवलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलन स्थळावरुन हटवल्याची माहिती मिळतेय. 'नीट' (NEET) सारख्या प्रमुख परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक 28 जूनपासून उपोषणावर होते.
'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) प्रवक्ते सौरभ दास यांनी या परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं. ते पुढे म्हणाले, "मला लोकांकडून समजलं की, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं जातंय आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय..."
जंतर-मंतर येथे CJP च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याआधीच सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यात आलंय.