‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कुन्या राजाची गं तू राणी’ ऑफ एअर झाली आहे. काल, १६ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. आता या मालिकेची जागा ‘साधी माणसं’ ही नवी मालिका घेणार आहे. दि. १८ मार्चपासून शिवानी बावकर व आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे. सध्या ‘कुन्या राजाची गं तू राणी’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर पोस्ट लिहित आतापर्यंतचा प्रवास चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत.
१८ जुलै २०२३ पासून ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका सुरू झाली होती. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री शर्वरी जोगने गुंजा तर अभिनेता हर्षद अतकरीने कबीर ही भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच गुंजा-कबीरच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
पण एक वर्षही न होता ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गुंजा-कबीरच्या लग्नाने मालिकेचा शेवट झाला. यानिमित्ताने शर्वरी व हर्षदने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत. दरम्यान, ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेत शर्वरी, हर्षद व्यतिरिक्त पूर्णिमा डे, समिधा गुरु, सविता मालपेकर, वसुधा देशपांडे, वनश्री पांडे, राजन भिसे, अमोघ चंदन असे अनेक कलाकार झळकले.