नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
img
Dipali Ghadwaje
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीलासुरुवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. आता मतमोजणी प्रक्रिया थोड्यावेळाकरीता थांबवण्यात आली आहे. 

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. प्राथमिक फेरीत 64 हजार 848 मतपत्रिका अपेक्षित होत्या.

मात्र काही वेळा पूर्वी मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आढळल्याने मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला होता. आता पुन्हा एकदा मतपेटीत दोन अधिक मतपत्रिका आढळल्या आहेत. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा आढळल्या जास्त मतपत्रिका 

मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. याआधी चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. आता पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने मतमोजणी केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे. सध्या पाच मतपत्रिका बाजूला काढून ठेवण्यात आल्या आहेत. या मतपत्रिकांचे नेमके करायचे काय? याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाईची मागणी 

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कारवाईची मागणी केली आहे. एका वृत्त संस्थेशी  संवाद साधताना सुधाकर बडगुजर यांनी म्हटले की, चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 3 मत पत्रिका जास्त आढळल्या आहेत. मतमोजणी कक्षातील 22 नंबरच्या टेबलवर मोजण्यात आलेल्या टेबलवर मतपत्रिका जास्त आढळून आल्यात. मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. 

 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group