परभणी बंदला हिंसक वळण आले आहे. संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथेफिरुने विटंबना केली. या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली.
यानंतर पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे.
परभणीत नेमकं काय घडलं?
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली आहे. काल मंगळवारी (१० डिसेंबर) एका माथेफिरूने संध्याकाळी 5.30 च्या सुमारास संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला उपस्थितांकडून जोरदार चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानतंर आंबेडकर अनुयायी संतप्त झाले. या घटनेनंतर काल आंबेडकरी अनुयायींकडून आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांकडून काल रेल रोकोही करण्यात आला. यानतंर रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन सुरु होते.
आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्तारोको देखील केला होता. आता हे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी दुकाने, रस्त्यावर गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.
यानंतर काही आंदोलक महिलांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यानंतर पोलिसांनीही अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच सध्या परभणीत दंगल नियंत्रण पथकही दाखल झाले आहे.