परभणी : भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत मोठी दंगल उसळली होती. त्यावेळी जमावाने जाळपोळ व दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ गुन्ह्यांची नोंद करून ५० जणांना अटक केली आहे. दरम्यान, परभणीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
संविधान अवमानाच्या निषेधार्थ बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. बुधवारच्या हिंसाचारप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले असून गुरुवारी ९ महिलांसह ५० जणांना अटक करण्यात आली.
जमावबंदी दुसऱ्या दिवशीही कायम होती. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यामधील अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती. परिस्थितीनुसार मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शाळा-महाविद्यालय भरवण्याचा निर्णय घ्यावा, असे पत्र शिक्षण विभागाने काढले.
गुरुवारी देखील शहरातील भाजीपाल्याचे लिलाव झाले नाहीत, तसेच काही भागात बाजारपेठ बंद होती. दरम्यान, विधान परिषद विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीतील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. बुधवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांच्या दुकानावरील पाट्या तसेच टपऱ्यांची आणि वाहनांची तोडफोड झाली होती.