'एक्स' आता होणार चक्क डेटिंग अ‍ॅप; इलॉन मस्कने केली घोषणा!
'एक्स' आता होणार चक्क डेटिंग अ‍ॅप; इलॉन मस्कने केली घोषणा!
img
Dipali Ghadwaje

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्स (पूर्वीचे ट्विटर) ताब्यात घेतल्यापासून, त्यात अनेक बदल केले आहेत. अलीकडेच मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. यानंतर आता  एक्सला 'एव्हरिथिंग अ‍ॅप' बनवण्याचा मस्क यांचा मानस आहे. त्यामुळेच आता एक्स हे डेटिंग अ‍ॅपदेखील होणार असल्याचं म्हटलं जात आहे. एका वृत्तसंस्थेने  याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

इलॉन मस्क यांनी एक्स कंपनीची एक बैठक आयोजित केली होती. एक्सचे व्हिडिओ कॉल फीचर टेस्ट करण्यासाठी ही बैठक होती. यावेळी कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मस्क म्हणाले, की "2024 पर्यंत एक्स हे एक 'फुल-फ्लेज' डेटिंग अ‍ॅप असेल." अर्थात, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर नाही आली.

इलॉन मस्कने गेल्या वर्षी तब्बल 44 बिलियन डॉलर्स एवढ्या किंमतीला ट्विटर हे अ‍ॅप विकत घेतलं होतं. त्यानंतर या अ‍ॅपचं नाव, लोगो आणि बऱ्याच गोष्टी इलॉनने बदलल्या. एक्सवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच करण्यात आलं आहे. सोबतच, या अ‍ॅपवर जॉब पोस्टिंग फीचरही सुरू करण्यात आलं आहे.  

एक्स अ‍ॅप लवकरच बँकेची जागा घेईल, असंही इलॉन मस्क म्हणाले आहेत. तसंच, यूट्यूब आणि इतर काही अ‍ॅप्सची जागा आता एक्स घेणार असल्याचा विश्वास देखील इलॉन मस्क यांनी व्यक्त केला.



 

इतर बातम्या
Join Whatsapp Group