अमृतसरमधील मजीठा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे अमृतसरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी दारूमुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण गंभीर आजारी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळातच पंजाब सरकार आणि राज्यात खळबळ उडाली आहे. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील मजीठा परिसरात मरारी कला, भंगाली कला, जयंतीपुर, थडीवाला आणि नंगल्ली गावांमध्ये विषारी दारूमुळे दुर्घठना घडली. रविवारी संध्याकाळी या गावांमध्ये स्थानिकांनी एकाच दुकानदाराकडूनदारू घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
रविवारी रात्री दारू प्यायल्यानंतर सोमवारी सकाळी काही जणांचा मृत्यू झाला. तर काही जणांना त्रास होऊ लागला म्हणून रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामधील काही जणांचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी पोलिसांना न कळवता काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. रात्री उशिरा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. मजीठा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चार संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी गावांमध्ये घरोघर जाऊन तपासणी केली आणि संशयित दारूचा साठा जप्त केला.
पोलीस अधिकारी साक्षी साहनी यांनी सांगितले की, सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चार जणांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये गेल्या ३ वर्षात घडलेला हा चौथा प्रकार आहे.