नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना सध्या समोर येत आहे. अशीच एक घटना पुण्यातूनही समोर आली. वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी मुलाने जे केलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल. या निर्दयी भावानं चक्क बहिणीला जबरदस्तीनं मानसिक रूग्णालयात दाखल केलं. नंतर आईला वृद्धाश्रमात ठेवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र इंदूर राय असे आरोपीचे नाव आहे. त्याचा वडिलोपार्जित मालमत्तेवर डोळा होता. वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी त्यानं कटकारस्थान रचलं. बहिणीची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर असतानाही, तिला मानसिक रूग्णालयात नेलं . नंतर बाउन्सर महिलांना आणून त्यानं बहिणीच्या डाव्या हातात इंजेक्शन दिलं. 'रक्त तपासणीसाठी नेतो आहे' असं सांगत त्यानं बहिणीला मेण्टल हॉस्पिटलमध्ये भरती केली. नंतर त्यानं आईला जबरदस्तीनं वृद्धाश्रमात दाखल केलं.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी तरूणीला मेण्टल हॉस्पिटलमधून मुक्त केलं. बहीण लगेच घरी परतली. मात्र, धर्मेंद्रनं घरात तिला प्रवेश नाकारला. अखेर तिनं थेट चतु:श्रृंगी पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हांडे यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.