नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : लॅब चालविण्यासाठी जागा देतो, असे सांगत पाच जणांनी एकाची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना महात्मानगर परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की भिवंडी येथील मालविका हॉस्पिकेअर एलएलपी संस्थेच्या ऑरेंज हॉस्पिटल येथे लॅब चालविण्यासाठी जागा देण्याचे सांगत आरोपी डॉ. नवलकिशोर अण्णासाहेब शिंदे, वैशाली दिनेश डोळे, शीतल नवलकिशोर शिंदे, रूपा संदीप राव व डॉ. दिनेश सुखदेव डोळे यांनी फिर्यादी सुमित हरेश क्षीरसागर यांचा विश्वास संपादन केला.
क्षीरसागर यांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्यांनी आरोपींच्या बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण 40 लाख रुपये भरले. पैसे देऊनही आरोपींनी क्षीरसागर यांना जागा उपलब्ध करून दिली नाही. उलट त्यांनी या पैशांचा व्यक्तिगत कामासाठी उपयोग केला. क्षीरसागर यांनी आरोपींकडे अनेक वेळा पैशांची मागणी केली. आरोपींनी दरवेळी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्याचे टाळले.
हा सर्व प्रकार दि. 8 सप्टेंबर 2022 ते 12 फेब्रुवारी 2024 यादरम्यान महात्मानगर परिसरात घडला. या प्रकरणी क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार करीत आहेत.