विज्ञान आणि तंत्रज्ञान फार पुढे गेले आहे.त्यात आरोग्यविश्वात मोठी क्रांती झाली. गंभीर अशा आजारांवर औषधे निघाले उपचार सुरु झाले. अशक्य समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया यशस्वी होताना दिसत आहे. कॅनडात देखील अशीच अशक्य वाटणारी गोष्ट डॉक्टरांनी शक्य करून दाखवली आहे. कॅनडातील ३४ वर्षीय ब्रेंट चॅपमन एक दुर्मीळ आणि गंभीर आजाराने त्रस्त होता.
ब्रेंट चॅपमन १३ वर्षांचा असताना, त्याने वेदनाशामक औषध इबुप्रोफेन घेतल्यानंतर त्याला स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम नावाचा एक दुर्मीळ आणि गंभीर स्वयंप्रतिकार विकार झाला. या विकारात शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून शरीराच्याच पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे त्वचा आणि श्लेष्मल त्वचेला गंभीर इजा होते आणि चॅपमन यांच्यासोबतही असेच घडले. या सिंड्रोममुळे चॅपमनच्या संपूर्ण शरीरावर, डोळ्यांच्या पृष्ठभागासह, भाजल्यासारख्या गंभीर जखमा झाल्या.
त्याच्या डाव्या डोळ्यातील कॉर्निया खराब झाला, ज्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याची द़ृष्टी पूर्णपणे गेली. तर उजव्या डोळ्यातील कॉर्नियालाही इजा झाल्यामुळे त्यातील बहुतेक द़ृष्टी त्याने गमावली. चॅपमनवर पुढे ५० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या, ज्यात उजव्या डोळ्यात कॉर्निया प्रत्यारोपण करण्याचा १० वेळा प्रयत्न करण्यात आला, काही शस्त्रक्रियांमुळे त्याला तात्पुरती थोडी द़ृष्टी मिळाली, पण कायमस्वरूपी द़ृष्टी परत आली नाही. त्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला.
चॅपमनची द़ृष्टी परत आणण्यासाठी डॉक्टरांनी १९६० पासून अस्तित्वात असलेली मात्र कॅनडामध्ये कधीही न करण्यात आलेली शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला. चॅपमनसमोर डॉक्टरांनी ओस्टिओ-ओडॉन्टो-केराटोप्रोस्थेसिस नावाच्या शस्त्रक्रियेचा प्रस्ताव ठेवला, जी ‘टीथ-इन-आय’ शस्त्रक्रिया म्हणून ओळखली जाते. या शस्त्रक्रियेत रुग्णाचा एक दात काढून, त्याच्या डोळ्याच्या पोकळीत बसवला जातो.
हा दात पारदर्शक, प्लास्टिक लेन्ससाठी एक आधार म्हणून काम करतो. ही लेन्स खराब झालेल्या कॉर्नियाची जागा घेते आणि डोळ्यात प्रकाश जाण्यास मदत करते. या शस्त्रक्रियेसाठी त्या रुग्णांची निवड केली जाते ज्यांच्या डोळ्यातील रेटिना आणि ऑप्टिक नर्व्ह निरोगी असतात, म्हणजे डोळ्याच्या मागील बाजूस असलेले प्रकाश-संवेदनशील ऊतक आणि मज्जातंतू चांगले काम करत असतात.
2022 च्या एका अभ्यासानुसार, ज्या 59 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यापैकी 94 टक्के रुग्णांची द़ृष्टी 30 वर्षांपर्यंत टिकून राहिली. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील नेत्रचिकित्सा प्राध्यापक डॉ. ग्रेग मोलोनी यांनी चॅपमन आणि इतर दोन कॅनेडियन रुग्णांवर फेब्रुवारी 2025 मध्ये या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण केला. पहिला टप्पा : डॉ. मोलोनी यांनी चॅपमनचा एक दात (कॅनाइन दात) आणि त्याच्या आजूबाजूला असलेला थोडासा हाडाचा थर काढला. यामुळे दाताला रक्तपुरवठा होत राहिला. नंतर तो दात लहान तुकड्यांत कापून त्याला एक छिद्र पाडले. त्या छिद्रात लेन्स ठेवण्यासाठी एक प्लास्टिकचा दंडगोलाकार भाग बसवण्यात आला.
नंतर हा तयार केलेला दात काही महिन्यांसाठी चॅपमनच्या गालात बसवण्यात आला, जेणेकरून त्याच्या आजूबाजूला मऊ ऊतक वाढू शकतील. दुसरा टप्पा: जूनमध्ये, तो दात गालातून काढून चॅपमनच्या उजव्या डोळ्यात शस्त्रक्रियेने बसवण्यात आला. दात आणि आजूबाजूचे ऊतक रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातील असल्यामुळे, शरीराकडून ते नाकारले जाण्याची शक्यता कमी असते. शस्त्रक्रियेनंतर लगेचच चॅपमनला हालचाली जाणवू लागल्या. पुढील एका महिन्यात त्याची द़ृष्टी हळूहळू स्पष्ट झाली, तरीही थोडी अस्पष्टता होती. त्यामुळे, लेन्सची स्थिती योग्य करण्यासाठी ऑगस्टमध्ये त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्याच महिन्याच्या शेवटी, सुधारित चष्म्यांच्या चाचण्यांनंतर असे दिसून आले की त्याची द़ृष्टी 20/30 झाली आहे. याचा अर्थ, ज्या वस्तू सामान्य द़ृष्टी असलेल्या व्यक्तीला 30 फूट (9 मीटर) अंतरावरून दिसतात, त्या चॅपमनला 20 फूट (6 मीटर) अंतरावरून स्पष्ट दिसू लागल्या. ‘टीथ-इन-आय’ शस्त्रक्रिया कॉर्नियाच्या नुकसानीमुळे आलेल्या अंधत्वासाठी शेवटचा उपाय मानला जातो. अनेक भागांमध्ये होणारी ही शस्त्रक्रिया 12 तासांपेक्षा जास्त वेळ घेते आणि जगभरात ही शस्त्रक्रिया करणारे खूप कमी विशेषज्ञ आहेत.