नवरात्रीचा उत्सव सध्या महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात सुरु आहे. देवीआईचा हा सण. पण या सणात पालघरमध्ये एका आईने केलेल्या धक्कादायक कृत्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. मुलांचा खाण्याचा हट्ट त्यांच्या जीवावर बेतलाय. किरकोळ कारणावरून संतापलेल्या आईने स्वयंपाकघरातील लाटण उचलून मुलांना मारहाण केली. यात सात वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची मोठी बहीण मात्र गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
पालघर तालुक्यातील धनसार काशिपाडा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.पल्लवी घुमडे आणि तिचा पती गणेश घुमडे हे मूळ भाईंदर येथे राहत होते. गणेश रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी पल्लवी पतीपासून वेगळी राहू लागली. ती आपल्या बहिणीकडे राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती. महिलेचे नवरात्रौत्सवाचे उपवास सुरू होते. त्यातच मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला. यातून संतापलेल्या महिलेने मुलांना लाटण्याने खूप मारहाण केली.या मारहाणीत सात वर्षीय चिन्मय गणेश घुमडे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याची मोठी बहीण गंभीर जखमी झाली आहे.
दरम्यान, मुलं हट्ट केल्यावर आई-वडील दोघेही त्यांना मारायचे अशी माहिती समोर आली आहे. घटना उघड होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवीला अटक केली. सध्या पालघर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.