पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, पालघरमध्ये 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं करणार भूमीपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, पालघरमध्ये 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं करणार भूमीपूजन
img
Dipali Ghadwaje
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 76,000 कोटी रुपये आहे. जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मुंबईसह पालघरला भेट देणार आहेत. आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024’ ला संबोधित करतील.

त्यानंतर दुपारी १.३० ते २ च्या सुमारास पंतप्रधान मोदी हे 76 हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमीपूजन करतील. त्यासोबत पालघरमधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही मोदींच्या हस्ते केली जाईल.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यानिमित्त सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. यासाठी तब्बल 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

वाहतुकीत मोठे बदल

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह पालघरमधील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. या दौऱ्यानिमित्त अनेक महत्वाच्या व्यक्ती मुंबई अहमदाबाद महामार्गावरून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. भिवंडीतील मुंबई-ठाणे-कळवा मुंब्राकडून नारपोलीतील कशेळीमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना कशेळी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना वडपे नाका येथे ‘प्रवेश बंद’ राहणार आहे.

पंतप्रधान मोदींची मुंबई भेट

पंतप्रधान मुंबई भेटीदरम्यान पंतप्रधान ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 च्या विशेष सत्राला संबोधित करतील. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स यांनी संयुक्तपणे या जीएफएफचे आयोजन केले आहे. देशभरातील तसेच जगातील अनेक देशांतून आलेले विविध धोरणकर्ते, नियामक, जेष्ठ बँकिंग तज्ञ, उद्योग क्षेत्रातील अगणी तसेच शिक्षण तज्ञ असे सुमारे 800 वक्ते या परिषदेतील 350 हून अधिक सत्रांना संबोधित करतील. या चर्चेद्वारे फिनटेकविषयक परिदृष्यातील आधुनिक नवोन्मेषांचे देखील दर्शन घडेल. जीएफएफ 2024 मध्ये उद्योगविषयक सखोल जाण आणि सखोल माहिती देणाऱ्या विचारवंतांचे 20 हून अधिक अहवाल आणि श्वेतपत्रिका सादर होणार आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group