२०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरलंय. टीम इंडियाच्या जेतेपदाच्या विजयानंतर, सामना समारंभात मोठा नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. रोमांचक अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मोहसिन नकवी यांच्याकडून एशिया कपची विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर ट्रॉफी घेऊन नक्वी निघून गेले.
मोहसीन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एक प्रभावशाली पाकिस्तानी राजकारणी आहेत. संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्यानंतर, आणि टीकेची झोड उठल्यानंतर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने आशिया कप ट्रॉफी भारताला सादर करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र ट्रॉफी देण्यासाठी एक अटही मोहसीन नक्वीने ठेवली आहे.
मोहसीन नक्वीची अट
ट्रॉफी सादरीकरणासाठी पुन्हा एक समारंभ आयोजित करा, अशी अट मोहसीन नक्वीने ठेवली आहे. परंतु असा समारंभ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवस ट्रॉफीवरुन वाद कायम राहण्याची शक्यता दिसून येतेय.
ट्रॉफीबाबत आयसीसीचे नियम
ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेईल. सदर घटनेप्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहेत का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबाबत आयसीसीकडून तपास केला जाऊ शकतो.