२०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरलंय. टीम इंडियाच्या जेतेपदाच्या विजयानंतर, सामना समारंभात मोठा नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. या विजयानंतर पाकिस्तानी क्रिकेट टीमने पुन्हा एकदा लाजिरवाणं कृत्य केलं.
रोमांचक अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एक मोठा निर्णय घेतला. आशियाई क्रिकेट परिषद (ACC)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे प्रभावशाली नेते मोहसिन नकवी यांच्या विरोधात टीम इंडियाने स्पष्ट भूमिका घेत फायनल सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने त्यांच्याकडून एशिया कपची विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
या घटनेमुळे मैदानावर जवळपास दोन तास नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली. अखेर नकवी तेथून निघून गेले आणि ट्रॉफी आणि पदकंही कोणी तरी घेऊन गेलं. या सर्व प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, मोहसिन नकवी यांनी फक्त ट्रॉफीच नाही, तर भारतीय खेळाडूंसाठी ठेवलेली पदकंही बरोबर घेतली.
बीसीसीआयच्या सचिवांनी आता या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे. एसीसीचे प्रमुख आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, "भारत एका देशाविरुद्ध युद्ध करत आहे आणि त्या देशाच्या नेत्याने ट्रॉफी सोपवायची होती. आपल्या देशाविरुद्ध युद्ध करणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून आपण ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. म्हणूनच आम्ही ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला देण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्याच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे."